Saturday 11 May, 2013

हुरहूर


आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडला तेव्हा त्यातून विश्व प्रसरण पावतं आहे असा निष्कर्ष निघत होता. तो निरर्थक वाटल्याने आईनस्टाईनने स्थिर विश्व गृहीत धरून त्यानुरूप बदल स्वतःच्या मांडणीत केले.

पण १९२७ मध्ये हबलने विश्व प्रसारण पावत आहे हे सिद्ध करणारे पुरावे सादर केले आणि मानवाच्या विश्वाबद्दलच्या संकल्पनेत कमालीचा बदल झाला. विश्वातील प्रत्येक गोष्ट इतर सर्व गोष्टींपासून दूर जात आहे हे उमगल्यावर महास्फोटाच्या संकल्पनेला (big bang theory) मान्यता मिळाली. 

एखादा फुगा फुगवला तर त्यावरचे सर्वच डाग जसे एकमेकांपासून दूर जातात तशा प्रकारचे हे प्रसारण आहे. मग अशा या आपल्या विश्वाची सध्याची सहज प्रेरणा दूर-दूर जाण्याचीच असेल का? अंतर वाढत जाणं म्हणजे विस्कटत जाणं असंच ना! म्हणजे समजा दोन गोष्टी स्वप्रेरणेने जवळ आल्याही, तरी त्यांच्याही तळाशी ही वैश्विक विस्कटण्याची बीजंच? जवळ येतानाही दूर जाण्याची प्रक्रिया सुरूच?

जन्माचंच घ्या. आईच्या उदरात आईशी सतत संपर्क. तृप्ती. मग जगात प्रवेश केल्यावर आईपासून दूर जाणे. कधीही भरून न येणारं अंतर. मानसशास्त्राच्या समजुतीनुसार, आईपासून दूर होताना आपल्या आत स्पर्शाची आणि कुणीतरी आपला स्वीकार करण्याची गरज (need to belong) निर्माण होते, जी कधीच सर्वार्थाने पूर्ण होत नाही. सगळा प्रवास अतृप्तीने करावयाचा. काहीही करा, काहीही मिळवा, कितीही सुखी व्हा, सोबतीला शेवटी एक अनामिक हुरहूर आहेच.

विश्वप्रसरणाची प्रक्रिया एक दिवस(!) उलटणार आहे. तेव्हापासून मग विश्व आकुंचन पावत जाईल. The Brief History of Time या भन्नाट पुस्तकात शेवटी स्टीफन हॉकिंग्सने तेव्हा कसं होईल याविषयी गमतीदार कल्पनाविस्तार केला आहे. म्हणजे आपल्याला भविष्यकाळ आठवेल आणि भूतकाळाबद्दल कुतूहल असेल? आधी मृत्यू, मग वार्धक्य, मग तारुण्य, मग बालपण आणि शेवटी जन्म, आणि त्याच्याही नंतर आईचा जन्म? पण आधी आणि नंतर यालाही काय अर्थ? सगळंच अतर्क्य.

तेव्हा कदाचित एक होईल. मूळ प्रेरणा जवळ येण्याची असेल. अंतरे मिटत जातील. प्रवास अतृप्तीतून तृप्तीकडे होईल.   

पण तोवर सोबतीला काय?

हुरहूर…