Monday 30 September, 2013

जगण्याची प्रेरणा

वास्तविक मला ज्या विषयावर क्रमाने लिहित जायचं आहे, ज्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे, ती म्हणजे व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्पर संबंध, अशा संबंधांची गरज, त्याचे फायदे-तोटे व त्यातून निर्माण होत असलेले ताण.

मात्र हा शोध घेण्यापूर्वी, या विषयाकडे अधिक नेटकेपणाने पाहता येईल असा दृष्टीकोन तयार केला पाहिजे, काही मापदंड ठरवले पाहिजेत.

त्यादृष्टीने प्रस्तावना म्हणून काही निराळ्याच (भलत्याच) गोष्टींपासून सुरुवात करतो.

---

मानवाची, किंबहुना आपल्या सृष्टीतील सर्वच जीवांची, मुलभूत आदिम प्रेरणा कोणती याचा तर्कशुद्ध वस्तुनिष्ठ शोध आपण घेत गेलो, तर "तगून राहण्याची प्रेरणा" (Instinct to Survive) या उत्तराशी आपण येऊन पोचतो. जवळपास कोणतीही गोष्ट, निर्णय, कृती, वागणं, भावना, विचार अथवा प्रतिक्रिया आपण नीट तपासत गेलो, त्याच्या खोलात शिरत गेलो, तर मुळाशी हीच प्रेरणा सापडते. (आत्महत्येसारख्या काही बाबी आणखी विस्ताराने स्पष्ट केल्या पाहिजेत; आता तरी त्यात शिरत नाही; नंतर कधीतरी शोधावंसं वाटेलही, माहीत नाही.)

ही जी तगण्याची प्रेरणा आहे ती चार पातळ्यांवर प्रगट होते.

पहिली सर्वात दृश्य पातळी म्हणजे आपण "स्वतः" (Survival of the Self). जन्माला आल्यापासून आपल्याला जगायचं असतं. आपल्या बऱ्याचशा इच्छा, आकांक्षा, सुखं, दु:खं हे याच प्रेरणेचे दृष्य अविष्कार असतात, विशेषतः बालपणी व तरुणपणी. असं म्हणतात की माणसाला सर्वाधिक कोणती गोष्ट हवी असेल तर ती म्हणजे आनंद. पण ते पूर्ण सत्य नाही. आपल्याला आनंदाची अपार ओढ असते हे खरं, पण जीवनात आनंद नसला तरी जगण्याची आस (सहसा) टिकून राहते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही माणसं जगत राहतात, मूळ प्रेरणा टिकून राहते. आनंदी जगणं हवं असलं तरी, ते शक्य नसल्यास तेवढयाने माणसं जगणं नाकारत नाहीत.

दुसरी याहून थोडी खोल पातळी म्हणजे आपली "स्वतःची गुणसूत्रे" (Survival of my DNA). आपण स्वतः एक मर्यादित काळच तग धरू शकणार आहोत, त्यापुढे आपण टिकून राहू शकतो ते आपल्या गुणसुत्रांद्वारे. ही प्रेरणा आपल्याला पुनरुत्पादानाला प्रवृत्त करते. भिन्नलिंगी जोडीदार मिळणे, मुलं होणे, त्यांची प्रगती होणे, नातवंडं होणे या गोष्टी म्हणूनच अतीव आनंदाच्या, समाधानाच्या ठरतात.

तिसरी याहून खोल पातळी म्हणजे आपली "स्वतःची प्रजाती" (Survival of my Species). आपली गुणसूत्रे ही आपल्या प्रजातीतील असंख्य गुणसुत्रांपैकी एक. स्वतःची गुणसूत्रे कालौघात नष्ट झालीच तरी आपली प्रजाती शक्य तोवर टिकली पाहिजे ही प्रेरणा आणि शिवाय प्रजाती टिकली तर स्वतःच्या गुणसुत्रांचे संवर्धन होण्याची वाढीव शक्यता हा एक आनुषंगिक फायदा. यातून आपल्या माणसांसाठी, देशासाठी जीव द्यायला माणसं तयार होतात. समाजाचं भलं व्हावं, आणि एकूणच मानवजातीचं कल्याण व्हावं यासाठी झटतात.

चौथी सर्वात खोल पातळी म्हणजे आपली "जीवसृष्टी" (Survival of the Life). आपल्या प्रजातीपलीकडे जीवसृष्टीचा प्रचंड विस्तार आहे. यदाकदाचित आपली प्रजाती नष्ट झाली तरी जीवसृष्टी टिकली पाहिजे ही प्रेरणा आपल्याला भूतदयेला प्रवृत्त करते. पर्यावरणाचा, इतर प्राणीमात्रांचा विचार करायला भाग पाडते.

या चारही पातळ्या मी येथे थोडक्यात, ढोबळपणे (आणि कदाचित त्रोटकपणे) मांडल्या आहेत. विस्ताराने त्यांच्याविषयी लिहिण्याची गरज नाही; एकाच प्रेरणेच्या या चार स्वतंत्र पातळ्या आहेत इतकी जाणीव या टप्प्यावर पुरेशी आहे.

---

आता यात गंमत अशी आहे की, एकाच मूळ प्रेरणेच्या या पातळ्या असल्या तरी त्या सदैव परस्परपूरकच असतील असे नाही. कित्येकदा दोन पातळ्यांमध्ये ताण निर्माण होतात, परिस्थितीनुरूप त्यांच्यातील संबंधांचे संदर्भ बदलतात, झगडा निर्माण होतो, निवडीची गरज निर्माण होते, विवेकबुद्धीची कसोटी लागते.

त्यामुळे दोन पातळ्यांमधील संबंध समजून घेणे आणि ते संदर्भ ध्यानात ठेवून जगाकडे पाहणे, अनेकदा अर्थपूर्ण आणि निराळी दृष्टी देणारे ठरते. उदा. कुटुंबसंस्थेचा विचार करताना दुसऱ्या पातळीचे पहिल्या पातळीशी असलेले संबंध न्याहाळणे उपयोगी ठरते. अनेकदा हे संदर्भ छुपे असतात, सहज ध्यानात येणारे नसतात. पण थोडं खोल शोध घेत गेलं, तर कित्येकदा आपल्या आकलनाला वेगळी दिशा मिळू शकते.  

व्यक्ती आणि समाज यांच्यातील संबंधांची चिकित्सा करायची असं मी ठरवतो तेव्हा, पहिल्या व तिसऱ्या पातळीतील परस्परसंबंधांचा संदर्भ ध्यानात ठेवणे मला गरजेचे वाटते.