Monday 25 August, 2008

खपत्र - काही अनुभवाचे बोल

वाचकहो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेलच की "खपत्र" म्हणजे काय?! तर खपत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं "ईमेल".

आता या खपत्राच्या दुनियेत तुमचा प्रवेश कसाही होवो...

तुम्ही तंत्रज्ञानोत्सुक (म्हणजे मराठी असुनही technology savvy) वगैरे असाल तर स्वतःहुन
खपत्रखाते उघडाल. आणि नसाल तर टाळाल टाळाल आणि अगदी अडलात की झक मारत कोणातरी गाढवाचे (म्हणजे पुन्हा तंत्रज्ञानोत्सुक माणुसाचेच) पाय धराल आणि उघडुन घ्याल.

तुम्ही मराठी असाल तर तुमचं हे अडणंही साधारणतः खालील ३ पैकी एका प्रकारात मोडेल. म्हणजे एक तर तुमच्या अमेरिकेतल्या मुलाला तिकडुन त्याच्या घराचे आणि हापिसचे फोटो तरी पाठवायचे असतील; किंवा मग तुम्हाला इकडुन त्याच्यासाठी "चालुन आलेल्या" मुलींचे फोटो पाठवायचे असतील; नाही तर मग computer ऐवजी "चुकुन" भलत्याच "अश्मयुगीन" क्षेत्रात शिकल्याने गेली साडेअकरा वर्षे तुम्ही ascent बघत एकाच कंपनीत राहिलेले असाल आणि हल्ली internet वर देखील नोकर्‍या मिळतात अशी कुणकुण तुम्हाला अलीकडेच लागली असेल. अशा वेळी मात्र एखादी पाककृती प्रमाणासह शिकावी त्या आत्मीयतेने तुम्ही
खपत्र वाचण्याची आणि पाठविण्याची कला शिकुन घ्याल.

पण यातलं काहीही झालं तरी पहिल्या काही महिन्यांतला तुमचा प्रवास ठरलेलाच आहे.

--- ० ० ० ० ---

त्याचं काय होईल की,
खपत्र वापरायला लागुन आठवडा होतो न होतो तोच आयुष्यातल्या एका नीरस क्षणी तुम्हाला एक अग्रेषित खपत्र (forward email) येईल. अत्यंत बेसावध अवस्थेत तुम्ही ते वाचाल आणि त्यावर अक्षरशः लट्टु व्हाल. ते
खपत्र तुम्हाला पाठविणारा तुमचा मित्र त्यावेळी तुम्हाला अगदी देवदूतासम भासेल. कदाचित तुम्ही लगेचच त्याला फोन करुन धन्यवादही द्याल; निदान पुढील भेटीत तरी नक्कीच. तुमचा मित्र अगदी सुखावेल आणि...

...दुसर्‍या दिवसापासुन तुमच्या खपत्रपेटीत रोज ८-८
खपत्रांचा रतीब घालायला लागेल.

तुम्ही नित्यनेमाने आणि भक्तिभावाने आलेल्या प्रत्येक
खपत्रातील प्रत्येक ओळ वाचाल. अग्रेषित होत होत बारा गावचं पाणी चाखुन आलेलं खपत्र तुम्ही एखादी भेटवस्तू उघडुन पहावी तसं खपत्राच्या आतलं खपत्र, खपत्राच्या आतलं खपत्र, खपत्राच्या आतलं खपत्र उघडुन पहाल. जगाच्या कोणत्यातरी अनोळखी प्रांतात आणि लोकांत जन्मलेलं खपत्र असं कर्णोपकर्णी (की नेत्रोपनेत्री) होत होत शेवटी आपल्याही भाग्याला यावं याबद्दल त्या जगनियंत्याचे आभारही मानाल. तुम्हाला आलेलं प्रत्येक उत्कृष्ट, चांगलं, बरं, ठीक, वाईट, भिकार आणि तद्दन टाकावू खपत्र तुम्ही "सर्वगुणसमभावाने" जपून ठेवाल.

--- ० ० ० ० ---

काही काळाने तुम्हाला साक्षात्कार होईल की आपण फारच स्वार्थी आहोत; इतका सुंदर ठेवा (फुकट मिळत असुनही) आपण केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवत आहोत. मग त्या क्षणापासुन तुम्ही हा स्वार्थीपणा कायमचा सोडुन द्याल... आणि तुम्हाला आलेलं प्रत्येक
खपत्र तुमच्याकडील तमाम खपत्त्यांवर वर पाठवायला सुरुवात कराल.

अर्थातच तुमची अशी रास्त अपेक्षा असेल की ज्या व्यक्तिमात्रांवर आपण हा अनुग्रह करतो आहोत त्या प्रत्येकाने आपले तातडीने आभार मानावेत. पण त्वरित सोडाच एक संपूर्ण आठवडा लोटला तरी तुम्हाला एकही उत्तर येणार नाही. ८ व्या दिवशी मात्र तुम्हाला तुमच्या साहेबांचं (हो. तुमच्या कृपावर्षावातुन तुम्ही तुमच्या साहेबालाही वगळलेलं नसेल) एक दरडावणीचं
खपत्र येईल, "pl remove my name from this email list immediately". साहेबाच्या अरसिकपणाचं कौतुक चारचौघात करुन तुम्ही त्याला वगळुन तुमची समाजसेवा चालुच ठेवाल.

१४ च्या दिवशी मात्र तुमच्या समाजसेवेचं अजीर्ण होऊन तुमच्या एका जिवलग मित्राचं उत्तर येईल, "लेका, दुसरं काम नाही का तुला?!!"

खरंतर मित्राचा रोखठोक दिलखुलासपणा पाहुन तुम्ही क्षणभर सुखावाल. पण तेवढ्यात तुमच्या ध्यानात येईल की हा वात्रटपणा त्याने केवळ तुमच्या जवळ खासगीत केलेला नसुन CC मार्फत सर्व जगासमोर केलेला आहे. या आचरटपणाबद्दल त्याची चांगलीच खरडपट्टी काढण्याचे तुम्ही नक्की कराल. (त्यातल्या त्यात तुमच्या साहेबाला आधीच सुबुद्धी झाली याबद्दल तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल.) पण या घटनेमुळे TO आणि CC यांचा तिसरा भाऊ BCC याची ओळख तुम्हाला होईल. आणि तुमचा पहिला उद्योग BCC मार्गे चालुच राहिल.

--- ० ० ० ० ---

एव्हाना तुमच्या पुरवठादारांची संख्या एक वरुन ६-८ अशी झाली असेल, आणि ग्राहकांची संख्या तर चांगली १४-१५ पर्यंत पोचली असेल. ही एवढी उलाढाल त्यामागील supply chain च्या नाजुक दुव्यांसह सांभाळणे हा आता तुमच्या समोरील रोजचा व्याप असेल. या कार्याला न्याय देता देता तुमचे दिवसाचे २-२ तास खर्च होऊ लागतील. (ही बाब ध्यानी घेऊन हापिसने तुमच्या कामातुन थोडी सूट द्यावी अशीही तुमची अपेक्षा असेल.)

या भानगडीमुळे आलेलं प्रत्येक
खपत्र काळजीपुर्वक वाचणे एव्हाना तुम्हाला जड जावु लागेल. म्हणुन मग वाचायची राहिलेली खपत्रे तुम्ही तशीच साठवुन ठेवायला लागाल. वाढता वाढता वाढे होता होता लवकरच हा साठा शतक गाठेल. मग मात्र मुद्दाम वेळ काढुन तुम्ही हा साठा उपसायला लागाल.

पहिलं
खपत्र वाचुन तुम्ही खदखदा हसाल. दुसरं वाचुनही तुमची बर्‍यापैकी करमणुक होईल. तिसरं खपत्र मात्र तुम्हाला थोडं बेचवच वाटेल. चौथं वाचुन झाल्यावर तुम्हाला वाटेल की हे वाचलं नसतं तरी चाललं असतं. पाचवं खपत्र तुम्हाला अत्यंत भिकार वाटेल. आणि सहावं तुम्ही फार पुर्वी वाचलेल्यापैकीच एक निघेल. हे जुनाट खपत्र आता इतक्या काळाने तुम्हाला पुन्हा पाठवलेलं पाहुन तुम्ही चरफडाल. आणि सातवं खपत्र तर तुम्हीच आठवड्याभरापुर्वी अग्रेषित केलेल्यापैकी एक निघेल. ते पाहुन मात्र तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. अरे, सहन सहन म्हणुन किती करायचं माणसाने? उरलेल्या ९३ खपत्रांबद्दल तुम्हाला काहीच वाटणार नाही. कारण न वाचताच तुम्ही एका फटक्यात त्या सर्वांना कचराकुंडी दाखवाल.

याउप्पर
खपत्रांचा साठा करणे तुम्ही बंद करुन टाकाल. खपत्र आल्या आल्या वाचायचं आणि लगेच अग्रेषित करुन लगेच उडवायचं असा किफायतशीर उद्योग तुम्ही सुरू कराल. पण हा मार्ग तुम्हाला आवडायला लागतोय न लागतोय तोच तुमचा एखादा विश्वासु पुरवठादार दिवसाचा कोटा दुप्पट करुन टाकेल. सहजासहजी हार न मानता तुम्ही लढाल लढाल. पण शेवटी पराभव अटळ दिसु लागला की नाईलाजाने शस्त्र खाली ठेवाल आणि निर्णय घ्याल की खपत्र वाचायला वेळ नसेल तर न वाचताच अग्रेषायचं आणि उडवून मोकळं व्हायचं झालं.

--- ० ० ० ० ---

नेमकं याच दिवसात
खपत्रप्रांतात नव्यानेच प्रवेश केलेल्या एखाद्या भल्या माणसाकडुन तुमचे आभार मानणारं उत्तर तुम्हाला येईल. आणि आपण जरी वाचत नसलो तरी कुणीतरी वाचतंय या उदात्त भावनेने तुम्हाला अगदी भरुन येईल. मग हा प्रकार तुम्ही अगदी उत्साहाने नाही तरी आपला कसातरी चालु ठेवाल.

मात्र लवकरच एक दिवस त्या नवउत्साही सुहृदाकडुनच तुम्हाला स्वतंत्र पुरवठा सुरू होईल. अगदी तोडीस तोड परतफेडच. तुमचा जळफळाट, फणफणाट, तळतळाट वरैरे सारं काही होईल. पण केवळ दया म्हणुन तब्बल १३ दिवस हा प्रकार तुम्ही मोठ्या मनाने सहन कराल.

१४ व्या दिवशी मात्र हा प्रकार अन्याय अगदी असह्य होईल. आणि अगदी सणकुन तुम्ही उत्तर पाठवाल, "लेका, दुसरं काम नाही का तुला?!!"

--- ० ० ० ० ---

बस्स!! आता यापुढे जगातील कोणतेही
खपत्र तुमचा बालदेखील बाका करु शकणार नाही; विनोदी खपत्र तुम्हाला हसवु शकणार नाही; हृद्यद्रावक खपत्र तुम्हाला हेलावु शकणार नाही; आणि डोक्याला खुराक देणारं खपत्रतुम्हाला अजिबात आव्हान देऊ शकणार नाही.

"नैनं छिन्दंती e-पत्राणि" अशी तुमची अवस्था होईल आणि तुमचे उर्वरित आयुष्य सुखात जाईल.

तथास्तु!!

Tuesday 19 August, 2008

प्रश्नांकित

माझ्या मुलाला जेव्हा दिवसभर प्रश्न पडत रहातात, तेव्हा प्रत्येक वेळी त्याला उत्तरच हवे असते का? माझ्यामते ब‍र्याचदा हवे असते उत्तर त्याला; पण प्रत्येक वेळी नाही. केव्हातरी केवळ "हो रे!!" एवढी प्रतिक्रिया त्याला पूरे होते. म्हणजे काय तर हा प्रश्न पडल्याबद्दलची नुसती शाब्बासकी... बस.

"उत्तर मिळणे महत्वाचे नाही. प्रश्न पडणे आणि पडत रहाणे महत्वाचे"

कधी वाटते, ब्रह्म‍ज्ञान ब्रह्म‍ज्ञान म्हणतात ते सर्वज्ञाचे उत्तर नसून एखादा अफलातून प्रश्न तर नसेल? सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनला पडला तसा...

असा एक प्रश्न रोज आपल्या वाटयाला यावा की ज्याने दिवस उजळून जावा. मग आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील सर्वच ब‍र्यावाईट गोष्टींचा, सुखदु:खांचा उथळपणा त्या प्रकाशात असा लख्ख दिसतो की आपले आपल्यालाच हसु येते. अवकाश व्यापुन टाकणा‌र्‍या त्या प्रश्नासमोर आपला ओढून आणलेला सगळा आव अलगद गळून जातो. शरण जाण्यातला आनंद कळतो आणि मग "जितं मया" म्हणुन स्वत:चीच पाठ थोपटत रहावी लागत नाही.

अनादि अनंत कालापासून मातीत व काट्याकुट्यांत दडुन राहिलेल्या आणि अपघाताने अचानक साकार दर्शन देणार्‍या दगडाप्रमाणे एखादा प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतो, तेव्हा नजरेसमोर उरतो तो केवळ तेवढा प्रश्न.

आणि आपण होतो एक प्रश्नांकित!!