Tuesday 19 August, 2008

प्रश्नांकित

माझ्या मुलाला जेव्हा दिवसभर प्रश्न पडत रहातात, तेव्हा प्रत्येक वेळी त्याला उत्तरच हवे असते का? माझ्यामते ब‍र्याचदा हवे असते उत्तर त्याला; पण प्रत्येक वेळी नाही. केव्हातरी केवळ "हो रे!!" एवढी प्रतिक्रिया त्याला पूरे होते. म्हणजे काय तर हा प्रश्न पडल्याबद्दलची नुसती शाब्बासकी... बस.

"उत्तर मिळणे महत्वाचे नाही. प्रश्न पडणे आणि पडत रहाणे महत्वाचे"

कधी वाटते, ब्रह्म‍ज्ञान ब्रह्म‍ज्ञान म्हणतात ते सर्वज्ञाचे उत्तर नसून एखादा अफलातून प्रश्न तर नसेल? सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनला पडला तसा...

असा एक प्रश्न रोज आपल्या वाटयाला यावा की ज्याने दिवस उजळून जावा. मग आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील सर्वच ब‍र्यावाईट गोष्टींचा, सुखदु:खांचा उथळपणा त्या प्रकाशात असा लख्ख दिसतो की आपले आपल्यालाच हसु येते. अवकाश व्यापुन टाकणा‌र्‍या त्या प्रश्नासमोर आपला ओढून आणलेला सगळा आव अलगद गळून जातो. शरण जाण्यातला आनंद कळतो आणि मग "जितं मया" म्हणुन स्वत:चीच पाठ थोपटत रहावी लागत नाही.

अनादि अनंत कालापासून मातीत व काट्याकुट्यांत दडुन राहिलेल्या आणि अपघाताने अचानक साकार दर्शन देणार्‍या दगडाप्रमाणे एखादा प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतो, तेव्हा नजरेसमोर उरतो तो केवळ तेवढा प्रश्न.

आणि आपण होतो एक प्रश्नांकित!!

2 comments:

विद्या कुळकर्णी said...

नीरज,

प्रश्नांकित हा ब्लॉग मस्तच आहे, आवडला.
"गारूड' वरच्या दोन ओळी फार छान आहेत. इतक्या की या कोणाच्या असाव्यात असा प्रश्न पडला.
लघुलेख लिहिता लिहिता कविताही लिहिल्या असशील तर पाठव ब्लॉग वर. (आणि लिहिल्या नसशील तर लिही अवश्य).

प्रश्नांकित च्या निमित्ताने माझे काही शब्द..

प्रश्नांची एक गंमत असते. उत्‍तर शोधून आपण विसावत असतो, तो लक्षात येते की उत्‍तरातून दोन नवीन प्रश्न पुढ्यात उभे आहेत. ही अशी वीण चालूच राहते.
आदिमानवापासून आजपर्यंतचा मानवाचा प्रवास हा प्रश्नांचाच प्रवास आहे.
त्यातही मजा अशी आहे की आदिमानवालाच पडलेलेच काही प्रश्न अजूनही आपल्याला पडत असतात.
मी कोण ? कुठून आलो ? कुठे जाणार ? या प्रश्नांची निश्चित उत्‍तरे मिळाली तर त्या प्रश्नांमधली गंमतच संपून जाईल. त्यापेक्षा अंदाज करत राहणे किती लोभवणारे आहे..

Unknown said...

uttam!

gaaruDaashI olakha karun deNaaryaa oLi chhan aahet.

uttam prashNa he praglabha manaache lakshaN aahe.