Saturday 2 November, 2013

समाजाची निर्मिती

गेल्या लेखात लिहिल्याप्रमाणे "तगून राहण्याची प्रेरणा" ही जवळपास आपल्या सर्वच गोष्टींच्या मुळाशी आहे.

तगून राहण्यासाठी निरनिराळे प्रयोग निसर्गात होत असतात, वेगवेगळे मार्ग अवलंबले जात असतात. मानवी समाजाच्या मुल्यांचे निकष लावून यातला अमुक मार्ग योग्य, तमुक अयोग्य असे म्हणण्यात अर्थ नाही. उलट निसर्गातील निरनिराळे प्रयोग पाहून, समजून घेऊन ही मूल्येच तपासायला हवीत. (म्हणजे लाल रंगाचा चष्मा घालून झाडं लाल आहेत असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. चष्माच तपासला पाहिजे.)

तगून राहण्यासाठी निसर्गात जे प्रयोग झाले/ होतात, त्यातला एक कमालीचा यशस्वी प्रयोग "समाजाची निर्मिती" हा होय.

ज्या प्रजातींमधील जीव तगण्यासाठी सक्षम ठरू शकले नाहीत, अशा अनेक प्रजाती कालौघात नष्ट झाल्या. मात्र केव्हातरी कुठेतरी जीवांनी एकत्र येण्याची, परस्पर सहकार्याने जगण्याची युक्ती निसर्गाला सापडली. या युक्तीचा कमी-अधिक वापर करून अनेक प्रजातींना तगून राहण्याची क्षमता आणि शक्यता वाढवता आली. जीवसृष्टीतील निरनिराळ्या प्रजातींमधील समाजरचना अभ्यासली तर समाजनिर्मितीच्या प्रक्रियेचा एक ढोबळ अंदाज येतो.

मूळ अवस्था ही स्वतःच्या प्रजातीतील दुसऱ्या जीवाशी अजिबात (पुनरुत्पादनासाठीही) संबंध येत नाही अशा प्रजातींचा. यात जिवाणू, विषाणू यांच्यापासून काही वनस्पतींपर्यंतच्या प्रजाती मोडतात. या अवस्थेला आपण असामाजिक असं म्हणू शकतो.

त्यानंतर पुनरुत्पादनापुरता संबंध येतो अशा प्रजाती (उदा. डास, काही प्रकारचे मासे) आणि मग त्याशिवाय पिल्लांचे संगोपन करण्यापुरता संबंध येतो अशा प्रजाती (उदा. काही प्रकारचे पक्षी) असे टप्पे येतात. इथे समाजनिर्मितीची नुसती चाहूल लागायला सुरुवात झाली आहे, समाज म्हणावा असं अजून नाहीच. ही समाजपूर्व अवस्थाच.

समाजाची खऱ्या अर्थाने सुरुवात म्हणता येईल असा टप्पा तेव्हा येतो जेव्हा प्रजातीतील एक-एकटे जीव काही किंमत देऊन इतर जीवांशी संबध वाढवतात आणि त्याबदल्यात काही फायदा मिळवतात. उदा. एकटयाने चरत असताना हिंस्त्र प्राण्याच्या नजरेस पडलं तर मृत्यू जवळपास अटळ. समुहाने चरायला लागलं तर मात्र हल्ल्याची शक्यता कमी होते. शिवाय हल्ला झालाच तरी अनेकांपैकी एकावर होणार, त्यामुळे स्वतःचाच जीव जाण्याची शक्यता तर आणखीनच कमी होते. हा झाला फायदा (सहकार्याचा). पण याची किंमत काय? तर एकत्र चरल्याने पुरेसा चारा प्रत्येकाला मिळेलच असं नाही, त्यामुळे त्यासाठी स्वतःच्याच प्रजातीतील जीवांशी करावी लागणारी स्पर्धा.

किमतीपेक्षा फायदा अधिक असे झाल्यास सहकार्य करणारे जीव टिकतात, उत्क्रांत होत जातात आणि समाज निर्माण होऊ लागतो. सुरक्षेसाठी सहकार्य करणे, समूहातील अपरिपक्व जीवांचे संरक्षण व संगोपन सहकार्याने करणे, अन्न मिळवण्यासाठी सहकार्य करणे या टप्प्यावर आलेल्या समाजाला आपण प्राथमिक अवस्थेतील समाज म्हणू शकतो. या अवस्थेत ठराविक सदस्यांच्या समूहाने एकत्र राहणे, समूहातील इतर सदस्यांना ओळखणे या गोष्टी होताना दिसतात.

यापुढील टप्पा खुद्द डार्विनला गोंधळात टाकणारा. तो म्हणजे स्वतःचे नुक्सान अथवा हानी होत असूनही समाजाच्या फायद्यासाठी एखादी कृती करण्याचा. उदा. स्वतः जोखीम घेऊन, जीव धोक्यात घालून संकटाची सूचना समूहाला देणे, स्वतः मिळवलेले अन्न इतर जीवांसोबत वाटून घेणे. ("असे का" हा प्रश्न Theory of Evolution मध्ये "Problem of Altruism" या नावाने प्रसिद्ध आहे. Genetics मधील अलीकडच्या संशोधनामुळे या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आता मिळालेले आहे.) वरवर पाहता तगून राहण्याच्या नैसर्गिक प्रेरणेविरुद्ध या व अशा प्रकारच्या कृती काही सामाजिक प्रजातीतील जीव करतात. या अवस्थेला आपण विकसित समाज असे म्हणू शकतो.

मानवी समाज हा अशा विकसित अवस्थेतील समाज आहे. विकसित समाजावस्थेचं आणखी उपवर्गीकरण केलं जातं, मात्र त्यात न शिरता वरील विवेचनावरून आपण इतकंच लक्षात घेऊयात की आपल्या समाजाच्या व्यवस्थेत एकटी व्यक्ती अनेक प्रसंगी स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना सहकार्य करते (उदा. कामाची विभागणी), आणि त्याशिवाय इतर अनेक प्रसंगी स्वतःचं नुक्सान करून घेऊन समाजोपयोगी कृतीही करते (तथाकथित त्याग). त्याव्यतिरिक्त असामाजिक अवस्थेतील प्रजाती करतात तसं निव्वळ स्वतःपुरतं पाहणं हे देखील करतेच (तथाकथित स्वार्थ).

गेल्या लेखात आपण पाहिलं की, व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून आणि प्रजाती म्हणून तगून राहण्याच्या पातळ्यांमध्ये ताण निर्माण होतात. त्या ताणांचं मूळ समाजनिर्मितीच्या टप्प्यांमध्ये आणि आपल्या समाजाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये सापडतं. सहकार्य विरुद्ध स्पर्धा, तसेच स्वार्थ विरुद्ध त्याग हे त्या ताणाचे पदर आहेत. 

मानवी समाजापेक्षाही पुढील टप्प्यांवर पोचलेल्या प्रजाती जीवसृष्टीत आहेत. त्यांच्या सामाजिक अवस्थेला आपण अतिप्रगत असं म्हणू. यात मधमाश्या, मुंग्या आणि इतर अनेक प्रजाती मोडतात. यांच्या समाजाची लक्षणे म्हणजे वसाहतींची स्थापना (जे मानवानेही केलं आहे), पुनरुत्पादनाचा हक्क ठराविक सदस्यांपुरता मर्यादित असणे, पुनरुत्पादन न करणारे सदस्य वसाहतीसाठी निवारा बांधणे, अन्न मिळवणे, वसाहतीचं रक्षण करणे अशा ठरवून दिलेल्या कामाला जुंपलेले असणे (कामगार जमात) आणि नवीन पिढीचं संगोपन वसाहतीच्या पातळीवर एकत्रितरित्या केलं जाणे.  

या अतिप्रगत प्रजातींचं वैशिष्ट्य म्हणजे इथे व्यक्तीला थारा जवळपास नाहीच. प्रत्येक जीवाने ठरवून दिलेलं काम तेवढं करायचं आणि वसाहतीचं हित साधायचं, असा तो मामला आहे. (सतत पुनरुत्पादन एके पुनरुत्पादन करणाऱ्या माशीला भले आपण "राणीमाशी" म्हणू, पण खरंतर ते देखील जोखडच.)

अतिप्रगत सामाजिक अवस्थेतील प्रजातींमध्ये सस्तन प्रजाती फार नाहीत, पण काही आहेतच. मानवी समाजाची वाटचाल त्याच दिशेने तर चालू नाही ना?

3 comments:

मिलिन्द बाम said...

’अतिप्रगत’ म्हणायचं का याबद्दल शंका/मतभेद आहेत.

कम्युनिस्ट राजवटींनी (विशेषत: स्टॅलिन, माओ) हेच माणसांच्या बाबतीत करायचा घाट घातला होता. काही काळ यशही मिळतंय असं वाटलं पण शेवटी सगळं कोसळून पडलं. ’व्यक्ती’ चा बळी देऊन समाज निर्मिती ही माणसांना न मानवणारी गोष्ट आहे.

नीरज पाटकर said...

’अतिप्रगत’ या संज्ञेविषयी मी आग्रही नाही. ही काही अधिकृत संज्ञा नाही. इंग्रजीत याला eusocial म्हणतात. (eu+social, real social या अर्थी). Eu म्हटलं की त्यात इष्टपणाची झाक येते, ती मला नको होती.

विकसित होतानाच्या सर्वात पुढच्या टप्प्यावर असल्याने या सामाजिक व्यवस्थेला प्रगत (advanced) म्हणता येईल.

तगून राहण्याच्या नादात (एकटया जीवाला) "नको तितका" प्रगत समाज बनत गेल्याने "अति" (overboard या अर्थी) असं म्हणावंसं वाटलं. "अति" म्हणताना अनिष्टपणा निर्देशित होतो (उदा. अतिशहाणा) तो मला हवा होता.

> ’व्यक्ती’ चा बळी देऊन समाज निर्मिती ही माणसांना न मानवणारी गोष्ट आहे.
मला तितकीशी खात्री नाही. याविषयी पुढील लेखात.

विद्या कुळकर्णी said...

एकाच मानव समाजात वेगवेगळ्या सामाजिक पातळीवरचे लोक राहतात.
काही मानव समाजपूर्व अवस्थेतले काही प्राथमिक अवस्थेतील समाजातले,
काही विकसीत समाजातले काही अतिप्रगत समाजातले..
गुंतागुंत आहे ना?