Saturday 7 March, 2009

दृष्टांत

तो होता हासत नाचत
विसरुनिया भान सारे
आणिक होता छेडित सूर
अंतःकरणास भिडणारे

क्षणाक्षणांच्या उन्मादांना
जात होता सामोरा
पण कधी नसेलच उर्मी
खुशाल होई पाठमोरा

तनामनांच्या मर्यादांच्या
होता भोगत वेदनाही
परि आवेगे ढाळीत अश्रु
होत होता मोकळाही

सुखाच्या अन् दुःखाच्या
जरि होता तो अंकित
नव्हती अज्ञानाची जाणीव
की क्षणभंगुराची भीत

या अशा बेभान रंगी
जाहला दृष्टांत अवचित
शाश्वताचे अशाश्वताचे
जसे उमगले गुपीत

थबकले पाय थिरकणारे
अन सूर ते गाणारे
न उरले अश्रु आणिक
आवेगाने पाझरणारे

नुरले सुख नुरले दुःख
उरले कोरडे दर्शन आत
आगंतुक दृष्टांताची ही
असली जीवघेणी किंमत

2 comments:

Salil Chinchore said...

Nirajbhau, tumchi kavita 'peshva jaywant' chya valnavar jaate aahe ki kaay? One trait that i admire in you is crystal clear thinking - that gets reflected in your writing-esp. in articles. Mag ashi thodi durbodh kavita kashi suchali? may be u can share the context / inspiration for this work..

peshawa said...

अरे अरे न्याना झालासी पावन
तुझे तुज रूप कळो आले
किंवा
अणुहुनिया तोकडा तुका आकाशा एव्हडा

आणि तुझा हा दृश्टांत एकाच जातीचे

असे सापडते अचानक पिंपळाचे झाड
समयाच्या कणा मधे सगळ्यांनाच कधी ना कधी
तसे आपण सारेच क्षणभराचे बुद्ध!

छान!